साईरुप बहुउद्देशीय संस्थेबद्दल थोडेसे…

मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश भास्कर धुरी यांचं स्वप्न – ‘सिंधुदुर्गात पहिलं मनोरुग्णालय बांधण्याचं!’ आणि हे स्वप्न साकार झालं त्यांच्या अथक मेहनतीनं आणि जोडीला असलेल्या आपल्या आशिर्वादानं. दि. ५ जानेवारी २००५ ला ‘साईरुप मनोरुग्णालय’ हे नाव घेऊन हे नविन स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.

sairoop-building

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात, एम. आय. डी. सी. या परिसरात साईरुपची इमारत उभी आहे. २००५ पासून मनोविकाराने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींनी साईरुपचा लाभ घेतला आहे. त्यातील बहुतेकांना मानसिक आजारातून आणि मानसिक समस्यांतून बाहेर काढण्यास साईरुपने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. असंख्य व्यक्तींच्या दुवा आणि शुभेच्छा यांची शिदोरी बरोबर घेऊन साईरुप आपला विस्तार वाढवत आहे.

साईरुपच्या विस्ताराची पहिली सुरुवात झाली ती साईरुप मनोरुग्णालयापासून. सिंधुदुर्गात यापूर्वी मनोरुग्णालय नसल्याने मनोरुग्णांना उपचाराकरिता जिल्ह्याच्या बाहेर जावे लागे. हे जाणं निश्चितच गैरसोयीचं व्हायचं. ही गैरसोय लक्षात घेऊन साईरुप मनोरुग्णालय उभारण्यात आलं आणि आतापर्यंत बहुसंख्य रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.
निरोगी, सुखी व समाधानी आयुष्य जगण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न साकार होताना ब-याच अडचणी मात्र येत असतात. ब-याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. या अनेक समस्यांपैकी एक समस्या आहे ती ‘मानसिक आजारांची समस्या’.

सध्याच्या युगात सर्वांनाच प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे. ही स्पर्धा जगण्याची म्हणा किंवा कर्तृत्व दाखवण्याची! आणि यातून उद्भवतात ताणतणाव, नैराश्य आणि इतर ब-याच मानसिक समस्या. या मानसिक समस्यांवर वेळीच उपचार करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण उपचार न केल्यास त्या समस्या अधिक वाढत जातात व गुंतागुंतीच्या होऊन बसतात. आणि मग या सगळ्याचा परिणाम होतो आपल्या दैनंदिन जीवनावर, आपण करत असलेल्या व्यवहारांवर. हे टाळण्यासाठी या आजारांवर वेळीच योग्य उपचाराची गरज असते. अशा मानसिक आजारांसाठी योग्य औषधोपचाराबरोबरच योग्य समुपदेशनाचीही गरज असते. आजाराच्या गांभीर्यानुसार उपचार पध्दतीमध्ये बदल होत असतात.
रोजची दगदगीची जीवनशैली, नोकरी, व्यवसाय, घर, संसार यावरची कसरत, त्यातून येणारा ताण, येणारा मानसिक थकवा कमी करण्यासाठी उपाय म्हणून सध्या लोकांचं व्यसनाकडे वळण्याचं प्रमाण वाढत आहे. तसंच काहींच्या बाबतीत एक मजा म्हणून सुरु केलेलं व्यसनदेखील काही काळाने त्यांच्या ‘स्वत:’पेक्षाही मोठं व महत्वाचं होऊन जातं. ‘नको असलेली गोष्ट विकत घ्यायची सवय लागली कि हवे असलेले विकण्याची पाळी येते’ असं काहीसं त्यांच्या बाबतीत होतं. सध्याचा काळ बघता मोठी माणसंच नव्हे तर आता किशोरवयीन मुलंसुद्धा व्यसनाला मोठ्या संख्येनं बळी पडत आहेत. समाजातील चांगले कर्तेसवर्ते लोक व्यसनाच्या आहारी गेल्याने समाजही मागे पडत आहे. हे सर्व दुष्परिणाम थोपवण्यासाठी आवश्यकता आहे ती ‘व्यसनमुक्ती केंद्राची’.
व्यसनाने पछाडलेल्या लोकांना व्यसनाच्या दुष्परिणामांतून सोडविण्यासाठी ‘साईरुप बहुउद्देशीय संस्था’ स्थापन करण्यात आली आणि या संस्थेने सुरु केले आहे, साईरुप व्यसनमुक्ती केंद्र’. आतापर्यंत अनेक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून बाहेर येण्यास या केंद्राने मदत केली आहे. मनोरुग्णालयाच्या आवारातच सुरु करण्यात आलेलं हे केंद्र आता फार मोठ्या विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे.