व्यसन म्हणजे …

एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही.

व्यसनाधीनतेमागील कारणे

• भावनिक असुरक्षितता, प्रेमाचा अभाव
कोणतीही व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी मद्यसेवन करत नाही. काल्पनिक अथवा खर्‍याखुर्‍या प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी दारु किंवा अंमली पदार्थांचा वापर केला जातो.
पालक प्रेम द्यायला असमर्थ ठरले, पालकांमध्ये मतभेद असले, पालक हुकुमशाही प्रवृत्तीचे असले तर बालवयातच मुलांच्या मनावर ओरखडे उमटतात. या कारणामुळे मुले व्यसनाकडे वळण्याची शक्यता असते.

• पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव
सहज उपलब्ध होणारा पैसा व्यसनाकडे नेण्याची शक्यता असते.
आजच्या बदलत्या वातावरणात चंगळवादाला बळी पडलेल्या पालकांचे अंधानुकरण करणारी मुले नकळत व्यसनाला बळी पडत आहेत.

• उत्सुकता
व्यसन करणार्‍या पालकांना पाहून मुलांनाही धूम्रपान किंवा मद्यसेवनाचे आकर्षण वाटू लागते.
या टप्प्यावर मार्गदर्शन मिळाले नाही तर मुले भरकटतात. त्यांना विविध व्यसनांची चव घ्यावीशी वाटते. हीच उत्सुकता मुलांना व्यसनाच्या जाळ्यात अडकवते.

• संगत
शाळा, महाविद्यालये आणि निरनिराळ्या व्यवसायात व्यसनाला बळी पडलेले तरुण असतात. अशा व्यक्तींच्या संपर्कात वारंवार आल्याने एखादी निर्व्यसनी व्यक्तीदेखील व्यसनाकडे ओढली जाते व कालांतराने व्यसनाधीन होते.

व्यसनाधीनतेची लक्षणे

१. शारीरिक
• चेहरा व नाक लालबुंद होणे, नाक चोंदलेले असणे.
• हात, पाय किंवा चेहर्‍यावर सूज येणे.
• एकाएकी दृष्टिदोष उद्भवणे
• हृदय, छातीची दुखणी, खोकला, हृदयविकार इ.
• यकृताची आकारवृद्धी
• पुन्हा-पुन्हा संसर्गदोष होणे.
• अन्नपचनाच्या तक्रारी
• रक्तदाब अधिक राहणे, चक्कर येणे.
• हातपाय थरथरणे.
• विचारांचा गोंधळ आणि आकलनशक्तीचा र्‍हास होणे.
• स्मरणशक्तीचा र्‍हास होणे.
• नपुंसकता येणे.

२. मानसिक
• सहिष्णुता कमी अथवा अधिक होणे. यामुळे नेहमीच्या नशेसाठी मादक वस्तू कमी अथवा अधिक प्रमाणात लागते.
• उदास आणि चिंतातुर राहणे.
• भास होणे.
• नकारात्मक विचार प्रवृत्ती.
• चिडचिडेपणा वाढणे.
• असंबद्ध बडबडणे.
• तर्कनिष्ठतेचा अभाव
• निद्रानाश होणे
• संशयी मनोवृत्ती वाढणे

३. सामाजिक
• समाजात व्यसनी म्हणून प्रतिमा निर्माण होते. कामाच्या जागी उशिरा पोचणे, नोकरी जाणे व नोकरीच्या इतर समस्या
• वाईट वागणुकीमुळे कायद्याच्या समस्या उत्पन्न होणे.
• कौटुंबिक समस्या
• नातेसंबंध तुटणे.

४. आर्थिक
• कमावलेला पैसा व्यसनांवर खर्च होत असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट बनते.
• पुरेसा पैसा नसल्याने मुलभूत गरजादेखील भागवणं अशक्य होते.
• मुलांचे शिक्षण, औषधोपचार यासाठी पैसा पुरेसा पडत नाही.

व्यसनाधीनतेचे टप्पे

१ सुरुवातीचा टप्पा
व्यसनाचं प्रमाण वाढतं. नशा करण्याची वारंवारिता वाढते.
ब्लॅक आऊट- ब्लॅक आऊट म्हणजे बेशुद्ध पडणं नव्हे, तर नशेच्या भरात आपण काय केलं हे दुसर्‍या दिवशी आठवत नाही.
सदैव नशेचे विचार- नशा केलेली नसताना सुद्धा पुढची नशा कधी करणार या
विचारांनी मन व्यापलं जातं.

२ मधला टप्पा
• नियंत्रण गमावणं- सुरुवातीला आपण किती पीत आहोत यावरचं नियंत्रण जातं. मग काळ, वेळ याचं भान राहत नाही.
• पिण्याचं समर्थन- `नाहीतर मी नशा केलीच नसती’ अशाप्रकारे स्वत:च्या पिण्याचं / व्यसनाचं समर्थन केलं जातं.
• ‘मी’ पणा वाढतो- स्वत:चं वागणं चुकीचं आहे ते पटत असतं, पण मान्य नसतं. म्हणून प्रत्येक बाबतीत बढाया मारल्या जातात. मी कुटुंबासाठी एवढं करतो, तेवढं करतो असं सांगितलं जातं.
• आक्रमकता- एकूणच वागण्यात आक्रमकता येते. चढा सूर लावला जातो. इतरांच्या अंगावर धावून जाणं, शीवीगाळ करणं असे प्रसंग वारंवार घडू लागतात.
काही काळ नशामुक्त राहून दाखवणं- एव्हाना घरातले प्रश्न तीव्र झालेले असतात. त्यामुळे
`माझा कंट्रोल आहे’ हे सिद्ध करण्यासाठी काही काळ नशामुक्त राहून दाखवलं जातं.
(इथेच कुटुंबीय फसतात.)

३ जुनाट टप्पा
• बिंज पद्धतीनं पिणं- काही दिवस सलग २४ तास पिणं तर काही दिवस अजिबात न पिणं असं आलटून-पालटून चक्र सुरु राहतं.
• पिण्याची क्षमता कमी होते-विविध शारीरिक समस्या सुरु झालेल्या असतात. या अवस्थेत थोड्या मद्यपानाने सुद्धा किक बसते. दारु सहन होत नाही.
• नैतिक अध:पतन- सामाजिक / नैतिक बंधनं तोडली जातात. चोरी, व्यभिचार अशा गोष्टी हातून घडतात.
• संशयग्रस्तता आणि भास होतात.
दैनंदिन कामकाज ठप्प होतं.