प्रिय मित्रा… A letter to an alcoholic

प्रिय मित्रा,
कसा आहेस? आज इथं येऊन तुला ५ दिवस झालेत. बुधवारी १५ जूनला तू इथं दाखल झालास. त्यावेळी तुझी बहीण तुझ्यासोबत होती.
तू आलास तेव्हा,

  • तू खूप गप्प-गप्प होतास
  • काहीशी अस्वस्थताही जाणवत होती
  • झोपेची समस्या होती. झोप नीट लागत नव्हती. वाईट स्वप्नं पडायची.
  • तुला कानात आवाजही ऐकू यायचे
  • इकडे येण्यापूर्वी उलट्या व्हायच्या, हातपाय थरथरायचे, खूप घाम यायचा असंही समजलं

तू १० दिवसांसाठी व्यसनमुक्तीकरिता इथं राहणार आहेस. साईरुपचे नियम, वेळापत्रक तुला सांगितलेलं आहे. ते तू अतिशय चांगल्याप्रकारे पाळशील अशी खात्री आहे.

मित्रा, तू ज्या आजारासाठी इथं उपचार घेत आहेस त्याचं नाव आहे ‘व्यसनाधीनता’. ज्यामुळे सध्या तुला शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीवरुन असं समजलं की तुला व तुझ्या कुटुंबीयांना अनेक दु:खदायक व निराशाजनक प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुला खूप प्रमाणात मानसिक ताण व नैराश्य आलं आहे. त्यानंतर हळूहळू तुझं पिण्याचं प्रमाण वाढत गेलं व तू व्यसनाधीन होत गेलास. पण ज्या टेन्शनमुळे तू पिणं वाढवलंस ते टेन्शन मात्र अजूनही कमी झालेलं नाही.

मग सांग बरं, तू तुझ्या समस्येवर जो उपाय शोधला आहेस तो कितपत योग्य आहे? मूळात ‘व्यसन’ हा समस्येवरचा एक उपाय ठरु शकतो का? तू स्वीकारलेल्या या उपायाने तुझ्या आयुष्यात आणखी अनेक समस्यांची भर मात्र पडली आहे. म्हणून सगळ्यात अगोदर तुला स्वत:ला या आजारातून मुक्त व्हायचं आहे.

या आजाराची लक्षणं, व्यसनाधीनतेचे टप्पे यांविषयीची माहिती, तू सोडविलेल्या व्यसन प्रश्नावलीचा जो रिपोर्ट तुला दिला आहे त्यात सविस्तर दिलेली आहेत. ते तू नीट वाचून घे.

व्यसनाधीनता या आजारातून मुक्त होण्यासाठी काय-काय उपचार आवश्यक आहेत ते पुढे दिले आहे.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळच्या वेळी औषधं-गोळ्या घेणं.
  • पुरेसा समतोल व पौष्टिक आहार घेणं.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे “मला व्यसन सोडायचंच आहे व त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी करणार आहे” असा निर्धार करणं व तो पाळणं.
  • स्वत:बद्दल आत्मविश्वास बाळगणं.
  • आपल्या समस्यांबाबत समुपदेशकांची मदत घेणं.
  • तुझ्या व्यसनमुक्तीसाठी तुला जे-जे मदत करतील, त्यांची मदत तू पूर्वग्रहविरहित मनाने घेणं.
  • तुझ्या जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळं करणं.

मित्रा, पूर्ण निर्धाराने तू हे सगळं केलंस तर नक्कीच तू तुझ्या आजारातून पूर्ण बरा होऊ शकतोस.
तुझ्यात एक चांगला माणूस आहे. फक्त तो या व्यसनामुळे मागे पडलाय. व्यसनमुक्तीने तुझ्यातील चांगला माणूस, तुझ्यातील चांगल्या क्षमता पुन्हा तुला नक्की सापडतील आणि तुला अर्थपूर्ण, समाधानी, आनंदी आयुष्य जगता येईल.
तुझा आजार बरा होण्यासाठी साईरुपकडून तुला सर्वतोपरी मदत देण्यात येईल. तुझ्यासाठी विविधांगी लेक्चर्स, अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या जातील. तुझ्या समस्या, तुझा दृष्टिकोन, तुझा स्वभाव, गुण, दोष यासाठी तुला समुपदेशन दिलं जाईल. तुझी दैनंदिनी, आरोग्याची हालहवाल, समतोल आहार याकडेही लक्ष पुरवण्यात येईल.

साईरुपच्या मदतीचा हात स्वीकारुन तू लवकरात लवकर व्यसनमुक्त आयुष्य जगावंस एवढीच माफक अपेक्षा आहे. तुझ्या व्यसनमुक्त जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
तुझे,
साईरुप