व्यसनाधीन व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांना…A letter to an addict, his family & society

प्रति,
व्यसनाधीन झालेल्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना व त्यांच्या कुटुंबीयांना आणि अर्थातच त्यांच्या सहृदयी मित्रांना देखील माझा नमस्कार. मी डॉ. रुपेश भास्कर धुरी कुडाळ सिंधुदुर्गमध्ये जवळपास १७ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात वावरतो आहे. मी प्रथम पासूनच कुडाळ ग्रामीण रुग्णालयात व सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे जे काही रुग्ण तपासले त्यात मला प्रामुख्याने दारुच्या आधीन गेलेली मंडळी बरीच दिसत होती. इतर बर्‍याचशा शारीरिक व्याधींमध्ये गुंतागुंत निर्माण होण्यामागे ‘मद्य सेवनाचं कमी-अधिक  प्रमाण ‘हे कारण प्रकर्षाने जाणवत होते. हळूहळू काळ पुढे सरकत गेला. मी माझे स्वत:चे सिंधुदुर्गातील पहिले मनोरुग्णालय दि. ५ जानेवारी २००५ या रोजी सुरु केले.  त्यात पूर्वी पासूनच मी व माझा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व्यसनाधीन व्यक्तींसाठी शक्य तेवढी मदत पुरवत होतो. परंतु आज तुम्हाला कळविण्यास आनंद होत आहे कि ‘साईरुप बहुउद्देशीय संस्थेचे (रजि. न. एफ – २८६६ – सिंधुदुर्ग) स्वत:चे असे सिंधुदुर्गातील पहिले वहिले सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले ‘व्यसनमुक्ती विभाग’ आम्ही सुरु करित आहोत.

‘साईरुप व्यसनमुक्ती विभाग’ आपल्याच मदती करिता उभे केले गेलेले आहे.

‘‘व्यसन’’ जाणून घेताना

आम्हाला कल्पना आहे, व्यसनी व्यक्तीमुळे तुम्ही खूप त्रासला असाल, कंटाळला असाल. आजपर्यंत अनेक उपाय केले पण यश आले नाही, म्हणून कदाचित आपण निराशही झाला असाल.

पण, आजपर्यंत त्याच्या व्यसनाकडे तुम्ही ‘वाईट सवय’, ‘चुकीची किंवा अनैतिक गोष्ट’ म्हणून पाहत होतात. ‘‘त्याला बाकी सगळं कळतं पण मुलं-बाळं, संसाराची जबाबदारी कशी कळतं नाही?’’ म्हणून आश्चर्यचकीत झाला असाल. याचं कारण आजपर्यंत ‘व्यसन एक आजार आहे’ हे कदाचित आपल्याला ठाऊक नसेल.

व्यसन हा मधुमेह, ब्लडप्रेशर यांच्या सारखाच एक आजार आहे आणि योग्य उपचारांनी बाकीचे आजार जसे नियंत्रणात ठेवता येतात तसं व्यसनाच्या आजारालाही नियंत्रणात ठेवता येते.

या आजारात व्यक्तीच्या काही भावनांवरील नियंत्रण सुटते. चांगल्या-वाईटातील फरक करण्याची बुद्धी काम करत नाही. नशेबद्दल अनावर आकर्षण आणि नशा न केल्यास निर्माण होणारा शारीरिक व मानसिक त्रास ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. या आजाराला कारण फक्त अंमली पदार्थाचे सेवन हेच आहे. वारंवार अंमली पदार्थांच्या सेवनाने, शरीर त्या पदार्थांवर अवलंबून राहते आणि तो पदार्थं मिळविण्यासाठी माणूस चूकीचे, अनैतिक किंवा आक्रमक वर्तन करताना दिसून येतो. यालाच म्हणतात ‘व्यसनाधीनता’.

हजारो इतर व्यक्तींप्रमाणे तुमच्या कुटुंबातील व्यसनी व्यक्तीही तिच्या व्यसनमुक्त राहण्याच्या प्रामाणिक इच्छेने, कुटुंबाच्या भावनिक आधाराने व व्यसनमुक्ती केंद्रातील योग्य उपचाराने पुन्हा नवं आनंदी जीवन जगू शकते!

पूर्ण व्यसनमुक्त होण्याकरता खालील तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत

  1. व्यसनी व्यक्तीची स्वत:ची व्यसनमुक्त राहण्याची प्रामाणिक इच्छा
  2. कुटुंबाचा व सहृदयी मित्रांचा भावनिक आधार
  3. व्यसनमुक्ती केंद्रामार्फत केले गेलेले योग्य उपचार, समुपदेशन व पुनर्वसन

आम्हां सर्वांस म्हणजेच ‘साईरुप व्यसनमुक्ती परिवारास’ असे वाटते की आमच्या निर्देशानुसार जर तुम्ही चाललात तर तुम्हाला आरोग्य व नवं आनंदी जीवन जगण्याची संधी मिळू शकते.